मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू   

पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ताजे गावाच्या हद्दीत रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. पिकअप वाहनाचे चाक पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दोन तरुणांना भरधाव सिमेंट मिक्सरने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.
 
अजय कन्हैयालाल यादव (वय २५, रा. मुंबई) आणि अफजल मुर्तुजा खान (वय ३९, रा. बजुरामपूर, उत्तर प्रदेश) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. या अपघाताची माहिती राकेश कुमार नेत प्रसाद यादव (वय ३१, रा. इंदिरानगर, मुंबई, मूळ रा. रतनपूर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादी राकेश यादव हे त्यांच्या पिकअप वाहनाने मुंबईच्या दिशेने जात होते. ताजे गावाच्या हद्दीत द्रुतगती महामार्गावरील किलोमीटर ६७/७०० याठिकाणी त्यांच्या वाहनाचे चाक पंक्चर झाले. त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला सुरक्षितरित्या उभे केले. त्यानंतर अजय यादव व अफजल खान हे दोघे मिळून पंक्चर काढण्याचे काम करत होते.
 
त्याचवेळी सिमेंट मिक्सर वाहन भरधाव वेगाने येऊन थेट पिकअपला धडकले. या धडकेत अजय आणि अफजल हे दोघे मिक्सरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात पिकअप वाहनाचेही मोठे नुकसान झाले. अपघात घडल्यानंतर मिक्सरचा चालक राजेश यादव (वय ३०, रा. बेहरा, आजमगढ, उत्तर प्रदेश) हा कोणतीही माहिती न देता व वैद्यकीय मदत न घेता घटनास्थळावरून पसार झाला. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.
 

Related Articles